हा महाजालावरील एक मुक्त ज्ञानकोश आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. विकी हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.[१]
विकिमिडिया फाउंडेशन ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
जिमी वेल्स आणि लॅरी सँगर ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.[२] आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.[३][४] विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. मराठी विकिपीडिया हा ह्या ज्ञानकोशाची मराठी भाषेतील शाखा आहे.
मराठी विकिपीडियावर (या पानानुसार)सध्या यात ४८,४३४ लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
विकिपिडीयाची वैगुण्ये गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा ज्ञानकोश झाला आहे. मराठीतील विकिपिडीया इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी शोधयंत्रे वापरून शोधता येतो.
https://mr.wikipedia.org
सौजन्य ;- विकिपीडिया

Nice sir
ReplyDelete